याज्ञवल्क्य, कल्याण: मापदंड बनलेली संस्था !

याज्ञवल्क्य - कल्याण वास्तू

काही ज्ञाती बांधवांनी (मामा शाईवाले, काका पांडे, उपासनी गुरुजी, बा.ज. डांगे आदि) एकत्र येवून याज्ञवल्क्य संस्था १९५७ साली गणेश चतुर्थीच्या दिवशी कल्याणात स्थापन केली.
आज डॉ. सुरेश एकलहरे, श्री चंद्रकांत पुराणिक, श्री राजीव जोशी, श्री मिलिंद कुलकर्णी आणि अध्यक्ष श्री रामकृष्ण पाठक ही व्यावसायिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या व्यक्ती संस्थेच्या विश्वस्तपदी असून संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी झटत आहेत.
संस्थेची स्व:ताची वास्तू कल्याण शहरात मोठ्या दिमाखात उभी आहे.
याज्ञवल्क्य, कल्याण ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक या चार क्षेत्रात कार्यरत आहे.

शैक्षणिक

संस्थेने याज्ञवल्क्य संगीत कला अकादमीच्या माध्यमातून आणि गंधर्व महाविद्यालय मिरज यांच्या संलग्नतेतून शास्त्रीय संगीत, वादन, नृत्य आदी वर्ग सुरु केले. प्रबोधनाचे महत्व लक्षात घेवून दर वर्षी व्याख्यानमाला सुरु करण्यात आली. कीर्तन परंपरेचे महत्व लक्षात घेवून दरवर्षी ज्ञानेश्वर कीर्तन महोत्सव सुरु करण्यात आला.

सामाजिक

संस्था शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गौरव करीत असे. नवीन धोरणानुसार कल्याणातील सर्व शाळातील मग इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमातील असो, पहिल्या दोन विद्यार्थ्यांचा गौरव सुरु केला. मोफत वह्यांचे वाटप सुरु केलं. मुले तसेच पालकांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम सुरु केले. समाजाचे आरोग्यासाठी श्री. सुधाकर दिवेकर यांनी योग वर्ग सुरु केले, ठाण्याचे योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी वारंवार मार्गदर्शन केले. डॉक्टर एकलहरे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य शिबीर आणि वैद्यकीय मार्गदर्शन सुरु करण्यात आले.
लग्न जुळवताना पालकांची होणारी कुतरओढ लक्ष्यात घेता संस्थेने ठाणे, मुंबई, नासिक, पुणे येथील संस्थांच्या सहकार्याने वधूवर सूचक केंद्र सुरु केलं.
सर्व समाज एकत्र यावा, भारतीय संस्कृती व परंपरा यांचे संवर्धन व्हावे यासाठी सर्व समाजाला एकत्र आणणारी नवंवर्ष स्वागत यात्रा संस्थेच्या माध्यमातून २००२ मध्ये कल्याणात सुरु करण्यात आली. अनेक सामाजिक, शैक्षणिक, ज्ञाती समाजातील बांधव या स्वागत यात्रेत सहभागी होत असतात.

धार्मिक

धर्मो रक्षति रक्षितः हे ब्रीद तसेच यज्ञ संस्कृती व परंपरा यांचे संवर्धन म्हणून संस्था अनेक यज्ञ व याग आयोजित करते. त्या शिवाय शुक्ल यजुर्वेदीय श्रावणी, सामुदायिक मौंजी आदी उपक्रम चालू आहेत.

सांस्कृतिक

सांस्कृतिक उपक्रमा अंतर्गत स्थानिक कलाकारांना वाव दिला जातो. संगीत, वादन आदी उपक्रमामध्ये संगीत कला अकादमीच्या कलाकार कार्यक्रम सादर करीत असतात. कल्याणात साहित्यिक कार्यक्रम व्हावेत या हेतूने, महाराष्ट्र साहित्य परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद आदी संस्थांना कार्यक्रमा करिता सर्व प्रकारचे सहकार्य केलं गेलं. कल्याणातील कवी दर महिन्याला कवी संमेलन आयोजित करीत असतात. याशिवाय अनेक प्रासंगिक सांस्कृतिक कार्यक्रम उदा. भोगी, कोजागिरी, दिवाळी पहाट, जागतिक महिला दिन, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. संस्थेत अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, कीर्तनकार आदी कार्यक्रमांसाठी आवर्जून येत असतात.