याज्ञवल्क्य पुरस्कार

याज्ञवल्क्य पुरस्कार

कल्याण शहराला भारताचार्य वैद्य, कवी माधवानुज, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, लेखक दि.बा. मोकाशी, जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे, कल्याण भूषण वि.आ. बुवा अशी परंपरा आहे. कल्याणात अनेक नवीन पिढीतील कार्यकर्ते विविध क्षेत्र काम करीत आहे. या सर्वांचा शोध घेता यावा, अश्या विविध कार्या चा सन्मान करता यावा या साठी १९९९ पासून संस्थेने याज्ञवल्क्य पुरस्कार सुरु करण्यात आले. पहिला याज्ञवल्क्य पुरस्कार कल्याणचे लोकप्रिय नगराध्यक्ष, भारतीय जनसंघाचे कल्याण संस्थापक श्री भगवानराव जोशी यांना प्रदान करण्यात आला होता.हा पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक ,माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.यु.म.पठाण यांच्या प्रसन्न उपस्थितीत प्रदान कार्यात आला होता.

गेल्या सतरा वर्षांपासून नऊ याज्ञवल्क्य पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत,त्यात कल्याणातील प्रसिद्ध सामाजिक व्यक्तिमत्व सितारामशेठ पै
(२०००), व्हीआयपी उद्योगाचे मा.श्री.जयकुमार पाठारे (२००२),अंदमान निकोबारचे तत्कालीन नायब राज्यपाल आणि अभ्यासू संसद प्रा.राम कापसे (२००४),आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार श्री.सदाशिव उर्फ भाऊ साठे (२००७),प्रसिद्ध उद्योजक अजित स्कॅनिंग चे श्री.श्रीकांत परळीकर, संस्थेचे सुहृद व उद्योजक श्री.महम्मदशेठ मुल्ला(२०१०), व माजी शिक्षक आमदार मा.श्री.प्रभाकर संत (२०१२),तसेच यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य अशोक प्रधान(२०१४) यांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे.

दहावा याज्ञवल्क्य पुरस्कार ग्रंथासखा वाचनालयाच्या माध्यमातून दोन लाखांच्यावर ग्रंथसंपदेच्या माध्यमातून वाचन संस्कृती, वाचन संस्काराचे रोल मॉडेल असणाऱ्या तसेच स्वायत्त विद्यापीठाच्या माध्यमातून भाषा विषयक संशोधनाच्या कार्यास चालना देणाऱ्या श्री.शामसुंदर(शाम)जोशी यांना जाहीर करण्यात आलेला आहे. श्री.शाम जोशी यांना या क्षेत्रातील कार्या बद्दल तेवीस पुरस्कार लाभले असून महाराष्ट्र शासनाने पहिला कविवर्य मंगेश पाडगावकर “ भाषा संवर्धक पुरस्कार” देऊन नुकतंच सन्मानित केले आहे. मुळचे कल्याणकर असलेले शाम जोशी यांनी आपले कल्याणातील घरदार विकून तसेच आपला व आपल्या पत्नीचा सर्व भविष्य निर्वाह निधी वाचन व ग्रंथ संग्रहाच्या छंदासाठी वापरून उभारलेले बदलापूरचे ग्रंथसखा वाचनालय आज दोन लाखाच्यावर ग्रंथ संग्रहामुळे महाराष्ट्रातले संदर्भाचे एकमेव ठिकाण आहे. ग्रंथसखा मधील मराठी भाषेतील अनेक दुर्मिळ ग्रंथ,बखरी,आणि जुन्यातली जुनी मासिके हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. कर्जाचे प्रचंड डोंगर उभे करीत शाम जोशी आज हे सांस्कृतिक संचित मराठी भाषा आणि साहित्याच्या असीम प्रेमापोटी जीवापाड जपलाय, याच प्रेमातून भिलार या गावी महाराष्ट्र शासनाने उभारलेल्या पुस्तकांच्या गावाच्या उभारणीतही श्री.शाम जोशी यांचे महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राला सार्वजनिक वाचनालयांची इतिहासकालीन परंपरा आहे मात्र शासनाचे कोणतेही अनुदान न घेता केवळ वैयक्तिक पातळीवरच इतक आधुनिक ग्रंथालय म्हणून ग्रंथासखा आज जाणकार आणि संशोधकांचे आश्रयस्थान बनले आहे. सुप्रसिद्ध समीक्षक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.द.भि.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथसखाचे स्वायत्त विद्यापीठात रुपांतर झाले असून मराठी साहित्य,मराठी भाषा आणि संशोधनासाठी आधारवड बनलेले आहे.

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचा कल्याणकरांना सार्थ अभिमान आहे. अलीकडील काळात अनेक महिला कल्याणात विविध क्षेत्रात निरलसपणे कार्य करीत आहेत.अशा महिलांच्या कार्याची दखल घेता यावी यासाठी अशा कर्तृत्ववान महिलांना याज्ञवल्कय पुरस्काराबरोबरच संस्थेने २००७ पासून श्रीमती सुशीलाबाई एकलहरे पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरवात केली.

श्रीमती.सुशीलाबाई एकलहरे या कल्याणातील धडाडीच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या होत्या.कल्याण महिला मंडळ, उत्कर्ष मंडळ, महिला उद्योग मंदिर आदी संस्थांच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. कल्याणात जनसंघाच्या महिला आघाडीच्या त्या प्रमुख होत्या.गर्ल्स हायस्कूल,शिशुविकास शिक्षण संस्था यांच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.

अशा कर्तबगार महिलेच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कार सन २०००७ मध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कालिंदीबाई जोशी यांना प्रदान करण्यात आला, त्यानंतर गजानन विद्यालयाच्या संस्थापिका,आदर्श शिक्षिका श्रीमती.प्रतिभाताई भालेराव(२०१०), अदिवासी आगरी समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या अन्नपूर्णाबाई जोशी, तर अपंग पुनर्वसनाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या माजी महापौर वैजयंतीताई घोलप(२०१४)यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
ह्या वर्षी पाचवा श्रीमती.सुशीलाबाई एकलहरे पुरस्कार अंदमान निकोबार चे माजी नायब राज्यपाल प्रा.राम कापसे यांच्या पत्नी प्रा.स्मिताताई कापसे यांना रामायण आणि ग्रीक महाकाव्याच्या संशोधन आणि लेखना बद्दल देण्यात येणार आहे. महाभारत आणि रामायणाच्या समकालीन असलेले होमरच इलियड हे ग्रीक महाकाव्य गहन आणि गूढ आहे,प्रचंड पात्र असलेल्या महाकाव्यात परस्पर मानवी नातेसंबंध आणि त्यातला कार्यकारणभाव जोडता आला तरच त्यातील मिथक समजू शकतात.अशा जागतिक कीर्तीच्या महाकाव्यावर लेखन करणे आणि तेही रामभाऊ कापसे यांच्या सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या कार्याचा व्याप सांभाळत,अनेक त्सुनामी झेलत हे खूप मोठ आव्हान स्मिताताई कापसे यांनी या लेखनाद्वारे पेललं,सिद्ध केलं.आधी रामायणावरच्या “रामायणीय” या आरती प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या आणि अगदी अलीकडे “ग्रीक महाकाव्य” या माजेस्तिक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून मराठी वाचक,रसिक,व अभ्यासकांना जागतिक महाकाव्याच्या दाट जंगलांची कवाडे प्रा.स्मिताताई कापसे यांनी आपल्या लेखनातून उघडून दिलेली आहेत.

२०१७ हे याज्ञवल्क्य संस्थेचे हिरक महोत्सवी वर्ष आणि याज्ञवल्क्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी साहित्य रसिक विचक्षण वाचक व ओघवते वक्तृत्व असलेल्या लोकसभा अध्यक्ष मा.सुमित्राताई महाजन यांची उपस्थिती लाभावी हा पुरस्कारार्थींचा आणि संस्थेचा बहुमान आहे.